शरद पवारांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आता उघडउघड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला होता. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकीवजा इशारा देताना पवारांवर जोरदार टीका केली होती. राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईमध्ये आज शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना खा.संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असे म्हटले होते. शरद पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांवर टीका केली होती. ”माननीय शरद पवार साहेब गुवाहाटीतील आमदारांना धमक्या देत आहेत. ‘सभागृहात येऊन दाखवा,’ असे सांगितले जात आहे. ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. राणेंच्या या ट्विटनंतर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधी फेसबुक व ट्विटरवरून आणि नंतर प्रत्यक्षात पत्रकारांसमोर या मुद्द्यावरून राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढला आहे…
सध्या राज्यामधील सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना केंद्रीय मंत्र्यांकडून घरी जाऊ देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असून, हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. आता लोक धमक्या देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. देऊ द्या हरकत नाही. ही त्यांची संस्कृती आहे; पण ही भाजपची संस्कृती आहे का? असा सवालही राऊत यांनी विचारला.

शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देणारा कोणी महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना करावा लागेल. या देशात लोकशाही, स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्याचा आदर पंतप्रधान मोदी करतात, जगभरात त्यांना मान आहे. अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळवायचीय, चोरीच्या मार्गाने म्हणून अशा धमक्या देणे चुकीचे आहे. आम्हाला द्या धमक्या, आम्ही समर्थ आहोत; पण त्यांच्या वयाचा, अनुभवाचा, तपस्येचा तुम्हाला आदर नसेल तर मला असे वाटते की, आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत, असा टोला खा. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना लगावला. तसेच मोदी आणि शहा यांनी यासंदर्भात भाजपची भूमिका काय आहे, हे महाराष्ट्राला सांगावे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

फेसबुकवरूनही टीका

नारायण राणेंच्या शरद पवारांबद्दलच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत फेसबुकवरून एक पोस्ट केली असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला टॅग केले आहे. “महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल; पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

 

Share