मुंबई : अडीच वर्षांपूर्वी संकटाच्या काळात तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगले काम केले. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगले सहकार्य लाभले. अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली; पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचे दु:ख आहे. काही चुकले असेल तर माफ करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतून एक्झिट घेतली.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी (२९ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पार पडली. ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू असताना सलग दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले.
या कॅबिनेट बैठकीत तीन नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय इतर सात महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक असल्याची चर्चा आहे. कारण उद्या सरकारला बहुमताची परीक्षा द्यावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली गेली.
ही शेवटची कॅबिनेट आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले नाही. कॅबिनेट बैठकीत राजीनाम्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आतापर्यंत चांगले सरकार चालवले. सर्व सहकाऱ्यांना, मुख्य सचिवांना तसेच अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले. मंत्रिमंडळ बैठक संपताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या मंत्र्यांच्या खात्याचे विषय राहिले आहेत आहेत ते आपण पुढच्या कॅबिनेट मध्ये घेऊयात. तुम्ही जे सहकार्य केले आहे, त्याबद्दल धन्यवाद. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कायदेशीर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊयात. मागील अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केले, त्याबद्दल आभार… जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल, कोणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मला माझ्याच पक्षातील लोकांनी, सहकाऱ्यांनी धोका दिला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उरलेले निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येतील, असे सांगत कॅबिनेटच्या या बैठकीतून सर्वांचा निरोप घेतला.