मुंबई : विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवडही करण्यात आली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदारांचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले असून, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
यापुढील काळात अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांची जागा घेणार असून, येथून पुढे सभागृहात शिंदे सरकार विरुद्ध आजी पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. अजित पवारांचे सर्वपक्षीय नेत्यांनी अभिनंदन केले. या अभिनंदन ठरावाला अजित पवार यांनी उत्तर दिले. माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचे काम आपण करू. आषाढी एकादशीची पूजा कोण करणार याबाबत उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होती. पण आता एकनाथ शिंदे ही पूजा करतील. राज्यातील कोट्यवधी जनतेच्यावतीने तुम्हाला हे भाग्य मिळतेय ही आनंदाची गोष्ट आहे, असे अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले, सत्तेत नसतानाही चांगला विरोधी पक्षनेता राज्याच्या विकासात चांगले योगदान कसा देऊ शकतो हे आधीच्या लोकांनी दाखवून दिले आहे. सरकारची भूमिका जर राज्याच्या विरोधात जाणार असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. एकही कायदा सभागृहात चर्चेशिवाय होणार नाही. या सभागृहात शिस्त रहावी सभागृहाचे पावित्र्य रहावे. सभागृहाला सांगू इच्छितो की, विधिमंडळात काम करताना न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागू नये याची काळजी घ्यावी. महाराष्ट्राच्या विधानसभेची उज्ज्वल परंपरा आहे. त्यात विरोधी पक्ष नेत्याचीही परंपरा आहे. आमचा ग्रुप ९० च्या बॅचचा होता. त्यापूर्वी ८५ मध्ये बाळासाहेब थोरातांचा ग्रुप निवडून आला होता. पूर्ण बहुमत मिळून भाजप-शिंदे सत्तेत आले आहेत. जशी लोकशाहीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असते तसेच विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचे आहे.
महाराष्ट्रात सध्या दुबार पेरणीचे संकट आले आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असते. सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. आपण कायम न्याय मिळवून देण्यासाठी काम करू, असे अजित पवार यांनी नमूद केले.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मला बारामतीतून उमेदवारी दिली. त्यावेळी मला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. मी लोकसभेला देशात नंबर दोनच्या मतांनी निवडून आलो होतो. पहिल्या क्रमांकावर रामविलास पासवान निवडून आले होते. मी गॅलरीतून अनेकदा काम पहायचो. शरद पवारांमुळे लहानपणापासून राजकारण जवळून पाहण्याची संधी मिळाली होती. इथे आल्यानंतर इतरांकडे पाहून मी शिकलो. असे अजित पवारांनी सांगितले.