‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा

मुंबई : विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून आपला व समर्थक आमदारांचा होणारा ‘गद्दार’ असा उल्लेख करत आंदोलने करणाऱ्यांवरही भाष्य केले. या ५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत; पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढले नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. याप्रसंगी भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. आज आमचे आणि भाजपचे मिळून १६५ आमदार आहेत, पुढील निवडणुकीत २०० निवडून आणू, असे शिंदे म्हणाले. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे शब्द होते, अशी आठवणही यावेळी त्यांनी करुन दिली.

यावेळी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदे यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, मी जेव्हा घरी यायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे आणि सकाळी उठायचो तेव्हा ते कामावर गेलेले असायचे. महिन्यात १५-२० दिवस भेटही व्हायची नाही. माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला; पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी घरी उशिरा यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझे कुटुंब मानले. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुले माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला, असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले. कशासाठी जगायचे? कुणासाठी जगायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. माझी कुटुंबाला आवश्यकता होती. दिघेसाहेब पाच-सहा वेळा माझ्या घरी आले. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही, असे त्यांना सांगितले. त्यावेळी दिघेसाहेब म्हणाले, तुला दुसऱ्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसावेच लागतील. मी दिघेसाहेबांना देव मानतो. २०-२५ वर्षे एकनाथ शिंदेंने शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलेय. मी १७ वर्षांचा असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावलो होतो. आनंद दिघे यांची भेट झाली आणि वयाच्या १८ व्या वर्षी शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. मला अनेकजण सीनियर होते. त्यांना बोललो की, यांना करा तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, मला शिकवतो का?, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडामुळे आम्ही शंभर दिवस तुरुंगात होतो, त्यावेळी कसे दिवस काढले आम्हाला माहिती. तब्बल चाळीस दिवस तुरुंगात खूप त्रास सहन करावा लागला होता. ज्यावेळी छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली तेव्हा ते कर्नाटकात वेष बदलून राहत होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकत नव्हते. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला कर्नाटक मोहिमेवर पाठवले होते. जवळपास १०० शिवसैनिकांसह आम्ही कर्नाटक गाठले. मात्र, इथल्या लोकांनी आम्हाला मारहाण केली. त्यावेळी आम्हाला जवळपास ४० दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. बाळासाहेबांनी त्यावेळी प्रत्येक एक-एक लाख रुपये देऊन म्हणजे जवळपास एक कोटी रुपये भरून आम्हाला सोडवले होते.

आम्ही कधीही रक्तपात होऊ देणार नाही
आमची नैसर्गिक युती ही भाजपसोबत आहे, उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा मी पाच वेळा प्रयत्न केला; पण त्यांनी आमचे ऐकले नाही. स्वत:चे मंत्री पद दावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारांचे आम्ही शिवसैनिक आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, रोज तुम्ही शिवसैनिकांना आमच्याविषयी ‘गद्दार-गद्दार’ असे सांगता. आता काय आमचे पोस्टर वगैरे जाळून झाले आहेत. आता कोण जाळत नाही. आम्ही त्यावर कोठेही प्रतिक्रिया दिलेली नाही. शेवटी आम्ही ५० आमदार आहोत. प्रत्येकजण ७० हजार, ८० हजार, १ लाख, दीड लाख अशी मते घेऊन निवडून आले आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचे हजार दोन हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत; पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढले नाही.

भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही कधीही रक्तपात होऊ देणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. मात्र, एका मर्यादेपेक्षा सहनही करता येत नाही. मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या डोक्यात हा कधीही विचार येणार नाही. मी अजूनही आमच्या लोकांना (आमदारांना) सांगतो की, मी मुख्यमंत्री झालोय हे मलाच अजून माहिती नाही. मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही ५० लोक आहात ना, तुम्ही सगळेच मुख्यमंत्री आहात. उरलेले ११५ आमदार हे देखील मुख्यमंत्री आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

https://youtu.be/g-_w1Gymz_Y

एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत करणार अजून पैदा झालेला नाही
आमची खूप बदनामी करण्यात आली. माझ्याकडे चर्चेसाठी माणसे पाठवण्यात आली. तिकडे मला गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आले. हे सर्व बेकायदेशीरपणे करण्यात आले. एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे गटनेतेपदावरुन काढून टाकायचे, पुतळे जाळायचे, घरावर दगडफेक करण्याचे आदेश द्यायचे. एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत करणार अजून पैदा झालेला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आईमध्ये झालेल्या संभाषणाची आठवणही करुन दिली. तसेच आपल्यावर रेडे, प्रेतं, अशा टिप्पण्या केल्याबद्दल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे नाव न घेता खंतही व्यक्त केली.

Share