पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. भगवंत मान हे ४८ वर्षांचे असून, ते दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. चंदीगडमधील त्यांच्या मुख्यमंत्री निवासात सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शीख रिती-रिवाजांनुसार भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर उद्या लग्न बंधनात अडकतील.

भगवंत मान यांनी सहा वर्षांपूर्वी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला आहे. त्यांची पहिली पत्नी आणि दोन मुले अमेरिकेत वास्तव्यास आहेत. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर भगवंत मान यांनी दुसरे लग्न करावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. भगवंत मान यांचे लग्न त्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी होणार आहे. डॉ. गुरप्रीत कौर हरियाणातील हिसारच्या रहिवासी आहेत. भगवंत मान आणि गुरप्रीत दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीने त्यांच्यासाठी मुलगी पसंत केली. त्यानंतर भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांना भेटले. त्यांनी लग्नास होकार दिला. डॉ. गुरप्रीत कौर भगवंत मान यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहेत. भगवंत मान ४८ वर्षांचे आहेत, तर डॉ. गुरप्रीत कौर ३२ वर्षांच्या आहेत. डॉ. गुरप्रीत कौर साधारण कुटुंबातील आहेत. मान आणि गुरप्रीत यांचा विवाह मान पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच निश्चित झाला होता. मात्र, पंजाब विधानसभा निवडणुकीमुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडला.

डॉ. गुरप्रीत कौर यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. याआधी अनेकदा डॉ. गुरप्रीत कौर मान यांच्या घरी दिसल्या आहेत. भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असतानाही त्या उपस्थित होत्या. मात्र, चर्चा होऊ नये म्हणून त्या कायम मागे राहिल्या. भगवंत मान आणि गुरप्रीत मान यांच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. गेले काही दिवस भगवंत मान यांची आई आणि बहीण यांच्यासोबत गुरप्रीत बऱ्याचदा बाजारात खरेदी करताना दिसल्या होत्या. मुख्यमंत्री भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह उद्या ७ जुलैला चंदीगड येथे साध्या पद्धतीने होणार आहे. मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कॉमेडियनमधून राजकारणी झालेले भगवंत मान २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. संगरुर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. तेव्हा त्यांची पत्नी इंद्रजीत कौर यांनी त्यांचा प्रचार केला होता. मात्र, २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मान यांनी २०१९ मध्येही संगरुरमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. २०२२ मध्ये आम आदमी पक्षाने (आप) त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आपला पंजाब विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. भगवंत मान यांनी १६ मार्च २०२२ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली होती ज्यात त्यांनी राजकारणासाठी पत्नीपासून वेगळे होत असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मान हे आता दुसरे लग्न करत आहेत.

Share