शिवसेना खासदार भावना गवळी यांची प्रतोद पदावरून उचलबांगडी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील विधिमंडळात धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेकडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची शिवसेनेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून करण्यात माहिती दिली आहे. या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड केले आणि भाजपची साथ धरत ३० जूनला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये खा. भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. शिंदे गटात शिवसेनेचे ४० आमदार सामील झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार फुटणार?
कालच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती खा. राहुल शेवाळे यांनी केली होती. महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी महाविकास आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्याची रणनीती आखली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडासाठी भाजपकडून पुरवण्यात आलेली रसद पाहता शिवसेनेची भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, आता खा.राहुल शेवाळे यांनी पक्षाविरोधात जाणारा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदारही फुटतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास शिवसेना पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे गटाला फायदा मिळू शकतो.

Share