लंडन : ब्रिटनमध्ये राजकीय सत्तासंघर्षात अखेर त्या देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज (गुरुवार) देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. जोपर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत.
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करताना बोरिस जॉन्सन म्हणाले, त्यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष नवीन नेता आणि पंतप्रधान निवडेल. मला माझ्या कर्तृत्वाचा खूप अभिमान आहे. जोपर्यंत नवीन नेता निवडला जात नाही तोपर्यंत ते या पदावर राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जगातील सर्वोत्तम पद सोडल्याचे दुःख होत असल्याचे सांगून नव्या नेत्याला ते शक्य तेवढा पाठिंबा देतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अधिवेशनात नेत्याची निवड केली जाईल. पक्षाचे अधिवेशन ऑक्टोबरमध्ये होणार आहे. अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर जॉन्सन यांनी हे पाऊल उचलले आहे.
Boris Johnson gave in after more than 40 ministers quit his government and told him to go. It was not immediately clear whether he would stay in office while the Conservative Party chooses a new leader, who will replace him as prime minister: AP
— ANI (@ANI) July 7, 2022
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आलेल्या राजकीय संकटाप्रमाणेच ब्रिटनमध्येही राजकीय संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामा दिला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचा आरोप या मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे.
UK PM Boris Johnson confirms he will be stepping down and that his Conservative party will elect a new leader and Prime Minister
"I am immensely proud of my achievements, I will continue till a new leader is in place," said UK PM Boris Johnson pic.twitter.com/KtqboPnVzK
— ANI (@ANI) July 7, 2022
बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० मंत्र्यांनी बंडखोरी करत कालच आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तसेच या मंत्र्यांनी राजीनामे देताना पंतप्रधान जॉन्सन यांनाही राजीनामा देण्यास सांगितले होते. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना आपण तातडीने राजीनामा देणार नाही. जोपर्यंत त्यांची कन्झर्वेटिव्ह पार्टी नव्या नेत्याची निवड करत नाही तोपर्यंत आपण राजीनामा देणार नसल्याचे जॉन्सन यांनी याआधी म्हटले होते. मात्र, राजीनामा देण्यासाठी दबाव वाढल्यामुळे अखेर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजीद जाविद यांनी मंगळवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी ऋषी सुनक यांच्या जागी नदीम जाहवी यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. अर्थमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नदीम जाहवी यांनी ट्विट करत बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. महत्त्वाची बाब म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे दावेदार
बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषी सुनक मूळचे भारतीय असून इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुनक यांच्या व्यतिरिक्त पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस, डोमिनिक राब यांचेसुद्धा नाव पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून घेण्यात येत आहे.
बोरिस जॉन्सन यांनी यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ख्रिस पिंचर या व्यक्तीची हुजूर पक्षाचे (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) उपमुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली; पण पिंचर यांची पार्श्वभूमी वादग्रस्त ठरली. गेल्या महिन्यात एका खासगी क्लबमध्ये दोन पुरुष सदस्यांना आक्षेपार्ह प्रकारे स्पर्श केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. असे असूनही पिंचर यांची नियुक्ती जॉन्सन यांनी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला; परंतु अशा प्रकारे लैंगिक टिप्पणी किंवा वर्तनाची पिंचर यांची पार्श्वभूमी आहे. २०१७ मध्ये त्यांच्या विरोधात तक्रारी झाल्या होत्या. तरीदेखील २०१९मध्ये जॉन्सन यांनी पिंचर यांची परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. फेब्रुवारीमध्ये पिंचर यांना सत्तारूढ पक्षाचे उपमुख्य प्रतोद ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. पक्षामध्ये शिस्तपालनाची खबरदारी घेणे हे या पदाकडून अपेक्षित असते; पण बेजबाबदार वर्तन करणाऱ्या पिंचर यांच्यासारख्या व्यक्तीला वारंवार महत्त्वाच्या पदांवर कसे नेमले जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.