भगवान वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; बाॅलिवूड अभिनेत्याला अटक

मुंबई : भगवान वाल्मिकींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे बाॅलिवूड अभिनेत्याला चांगलेच महागात पडले आहे. बाॅलिवूड अभिनेता राणा जंग बहादुरला जालंधर पोलिसांनी धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

एकीकडे आपल्या माहितीपटामुळे दिग्दर्शक लीना मणिमेकलई या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी ‘काली’ या चित्रपटात हिंदू देवदेवतांना धूम्रपान करताना दाखवल्याने देशभरातून त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका होत आहे. दुसरीकडे अभिनेता राणा जंग बहादुरला भगवान वाल्मिकी यांच्याबद्दल टिप्पणी करणे महागात पडले आहे. अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांतून काम केलेल्या अभिनेता राणा जंग बहादुर यांनी एका टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीमध्ये भगवान वाल्मिकी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे वाल्मिकी समाजातील लोकांनी राणा यांचा तीव्र निषेध केला आहे. राणा जंग बहादुर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात वेगळा संदेश जात असून, समाजातील शांततेचा भंग होत असल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला आहे. राणा यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

राणा जंग बहादुरच्या वक्तव्यावर जालंधर, होशियारपूर आणि अमृतसर येथे आंदोलन करण्यात आले. वाल्मिकी समाजातल्या लोकांनी भगवान वाल्मिकी चौकात धरणे आंदोलन केले होते.
राणा जंग बहादुरला अटक केली नाही तर ११ जुलैला ‘भारत बंद’ पुकारला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. काही दिवसांपूर्वी अकाली दलचे नेते चंदन ग्रेवाल यांनी पोलिस अधिकारी गुरशरण सिंग संधु यांची भेट घेऊन राणा बहादुर यांना अटक करण्याची मागणी केली होती. याशिवाय वाल्मिकी संघटनांनी आक्रमक होत राणा यांच्याविरोधात निदर्शने केली होती.

लोकांनी केलेली आंदोलनं पाहता जालंधर पोलिसांनी राणा जंग बहादुरला अटक केली आहे. जालंधर न्यायालयाने राणा जंग बहादुरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्याला अटक केली गेली. जालंधरचे पोलिस उपायुक्त जसकिरणजीत सिंह तेजा म्हणाले, राणाला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कलम २९५ च्या आधारे अटक केली आहे.

राणाच्या माफीचा उपयोग नाही
बीबीसी पंजाबीच्या बातमीनुसार, भगवान वाल्मिकींवर आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल अभिनेता राणा जंग बहादुरने हात जोडून माफी मागितली होती. राणा म्हणाला, ‘मी मनापासून सगळ्यांची माफी मागतो. जे माझ्या वक्तव्यानं नाराज आहेत, त्यांची माफी मागतो. समाज मोठा आहे, पण मी छोटा आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाची जोडलेला नाही. मी फक्त अभिनेता आहे. कृपया मला क्षमा करा.’

Share