मुंबई : वसईच्या राजवली वाघरळश पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा निधीतून हा निधी देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी २ लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी ६ लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 13, 2022
दरम्यान, वसई- विरामध्ये पावासाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली आहेत. यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी असल्याने नागरिकांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणीच पाणी साचलेले पाहायला मिळाले आहे. शहरातील काही दुकानांमध्ये व सोसायटी आणि घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर वसई विरारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.