वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रात करणार एक लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे इतर अधिकारी, तसेच केपीएमजीचे अभिषेक प्रसाद, नितिका मेहता, अमित भार्गव, फॉक्सकॉनचे वेक्टर चेन, एरिक लिन, पिव्ही लिन, वेदांताचे सतेश अम्बरडर, प्रणव कोमेरवार, ऍवनस्टारचे ग्लोबल एम.डी आकाश हेब्बर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हा उद्योग राज्यात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य देखील प्राप्त करुन घेण्यात येणार आहे. हा उद्योग राज्यात आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन राज्याच्या एकूण सकल उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे  यांनी दिली.

वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत एमआयडीसीशी प्राथमिक चर्चा सुरू झाली असून त्यांना पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बैठकीतील सादरीकरणावेळी सांगण्यात आले.

Share