पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा; अतुल भातखळकरांची मागणी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत भातखळकरांनी शरद पवार यांचीही याप्रकरणातल्या सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अतुल भातखळकरांनी पत्रात काय म्हटलंय?
मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

 

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे

Share