पुणे : शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवण्यात आलं असून ठाकरे आणि शिंदे गटाला आता शिवसेनेच नाव देखील वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यावर अनेक राजकीय पक्षातील नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही यावर प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
विजय शिवतारे म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं, की जो निर्णय येईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे मोठे लोक कुठे काय गेम करतील सांगता येत नाही, असं म्हणत शिवतारे यांनी पवारांना टोला लगावला. यासोबतच ‘शिवसेना संपवायला जबाबदार शरद पवार आहेत, सगळा दोष पवार साहेबांचा आहे. यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, की २०१४ ला पवार यांनी भाजपला बिनर्शत पाठींबा दिला होता. तो त्यांचा कट होता. पवार साहेबांना शिवसेना-भाजप यांचा संसार चालू द्यायचा नव्हता. पवार यांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होतेच. मात्र, २०१९ ला एका खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
२०१४ पासून शरद पवार यांचा प्लॅन शिवसेना संपवण्याचा होता. हे शरद पवार यांचं कटकारस्थान आहे आणि त्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवला आहे. शरद पवार हे राज्यातल्या राजकारणातले बरमुडा ट्रँगल आहेत. त्यांच्या जवळ गेलेले सगळे संपतात. इतिहास उघडून बघा त्यांच्या जवळ गेलेले सगळे पक्ष संपले आहेत, असंही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.