समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव  यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलायम सिंह यादव यांना श्वास घेण्यास त्रास आणि रक्तदाब कमी झाल्याच्या तक्रारीनंतर २२ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. १ ऑक्टोबरच्या रात्री त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते, जिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते.

मुलायम सिंह यांचा अल्पपरिचय 

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९रोजी झाला. पाच भावांमध्ये मुलायम सिंह हे तिसरे अपत्य होते. मुलायम सिंह यांनी आपल्या करिअरची सुरुवात कुस्तीपासून केली होती. ते व्यवसायाने शिक्षक होते. काही काळ इंटर कॉलेजमध्ये अध्यापन केले. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवायचे होते. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरु नाथू मुलायम सिंह यांच्यावर प्रभाव टाकला आणि मुलायमसिंह यादव जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले. १९८२-१९८५ पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते.

१९६७ मध्ये मुलायम सिंह पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर ५ डिसेंबर १९८९ रोजी ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुलायम यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी समाजवादी पक्ष, प्रजा सोशालिस्ट पार्टी पुढे नेली. १९६७, १९७४, १९७७, १९८५, १९८९मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. मुलायम सिंह १९८९, १९९३आणि २००३ मध्ये यूपीचे मुख्यमंत्री होते. ते लोकसभेचे सदस्यही होते.

१९९६च्या निवडणुका जिंकून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यानंतर १९९८ मध्येही त्यांनी विजय मिळवला. १९९९ च्या निवडणुकीतही त्यांची विजयी घोडदौड सुरू होती. २००४ मध्ये त्यांनी मैनपुरीमधून लोकसभा निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये त्यांनी आझमगढ आणि मैनपुरी येथून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीतही या दिग्गज सपा नेत्याची विजयी घौडदौड कायम राहिली आणि मैनपुरीतून विजय मिळवून पुन्हा एकदा संसदेत पोहोचले.

Share