नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधववारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय सध्या सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगामही धोक्यात आल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सर्व स्तरांवरील रेल्वे अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली असून रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचीही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता तत्काळ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, असे आवाहन पवार यांनी केले.

Share