मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सुचना नागरिकांना केल्या जात आहेत. मात्र असे असतानाच राजकीय नेते मंडळी मात्र या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करुन नियम पायदळी तुडवत आहेत. गेल्या काही दिवसापासून राजकीय नेते हे विविध लग्नसमारंभ , सभांमध्ये सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं. जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राज्यात गेल्या २४ तासात अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, खा.अरविंद सावंत, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार, काॅंग्रेसचे आ. धीरज देशमुख, भाजपचे आ. अतुल भातकळर, खा. सुजय विखे यांना देखील कोरोनाची लागण झालच समोर आलं आहे.
तर याआधी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री केसी पडवी, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे, आ. शेखर निकम, निलय नाईक, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, मदन येरावर, यांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.विशेष म्हणजे यातील अनेक आमदारांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती.