‘शिवतीर्थ’ वर कोरोनाचा शिरकाव

मुंबई : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत, असे काल राज ठाकरेंनी सांगितले होते. मात्र १० दिवसांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज ठाकरे यांच्या‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर तातडीने इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असुन, या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल आज किंवा उद्या सकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत. आज मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

Share