पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यांनंतर नरेंद्र मोदी यांनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले प्रवासी ठरले. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोदी यांचा सत्कार केला. तसेच शाही फेटा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुबक मूर्ती देऊन सत्कार केला.

 

पंतप्रधान मोदी यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला. तेव्हा त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुला मुलींनी पंतप्रधानांना यावेळी अनेक प्रश्न विचारले. तसंच मोदींनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

Share