औरंगबाद- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक काल पार पडली या बैठकीत पहिल्या व दुसऱ्या डोसची असलेली टक्केवारी कमी आहे त्यामुळे जिल्हा निर्बंधमुक्त होवू शकला नाही. यावरून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुन्हा एकदा “नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल” असे निर्देश काढले आहेत.
लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये महसूल, पोलिस , आरोग्य कर्मचारी असणार आहेत. हे पथक लसीकरणाचा दुसरा डोस पात्र असूनही डोस न घेतल्याबाबतची तपासणी करणार आहेत. ही कारवाई पेट्रोल पंप , घरगुती गॅस सिलेंडर, वितरण एजन्सी, रेशन दुकान , माॅल, हाॅटेल, अशा ठिकाणी भरारी पथकाव्दारे तपासणी केली जाणार आहे.
तसेच जिल्ह्यातील ८ लाख ९० हजार नागरिक लसीच्या डोससाठी पात्र असणाऱ्यांनी तात्काळ लसीकरण करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यावेळी बैठकीला मनपा आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडे , पोलीस आयुक्त निमित गोयल , निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल , जि.प अध्यक्षा मीना शेळके आदींची उपस्थिती होती.