नागपूर- शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.तसेच त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर टिका करत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याविषयी वक्तव्य केलं आहे.
संजय राऊतांना मलिकांच्या राजीनाम्या विषयी विचारले असता, त्यांनी म्हंटले की, नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. ईडीने त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली आहे. आम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात घाई केली. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही सर्वात मोठी चूक होती.
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. तपास यंत्रणा या सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. कुठल्याही राज्यात गैरवापर करून सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न करतात. तपास यंत्रणांचा मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीने चौकशीसाठी बोलावलं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नागरिकाला ईडीचं भय दाखवलं. त्यांना वाटत असेल पण आम्ही दिल्लीसमोर अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा तर प्रश्नच सोडा, अशी टीका संजय राऊतांनी तपास यंत्रणांवर केली.