पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पेटले ; १० जणांना जिवंत जाळले

 पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला तोंड फुटले आहे. सोमवारी, तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जळले आणि मरण पावले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त एएनआयने प्रसिध्द केले आहे.

वृत्तानूसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतरच रात्री ही जाळपोळीची घटना घडली असून यात १० जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हा बोगतुई गावचा रहिवासी होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तृणमूलच्या एका गटाने ही जाळपोळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परंतू तृणमूलच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी मंगळवारी दुपारी दावा केला की हिंसाचाराच्या वेळी आग लागली नव्हती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे घरांना आग लागली. तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे नाकारत मंडल म्हणाले की, शॉर्ट सर्किटमुळे लोकांच्या घरांना आग लागली आणि त्यामुळेच मृत्यू झाला आहे.

Share