विरोधकांना संधी उपलब्ध करून देवु नका संपकऱ्यांना ऊर्जामंत्र्यांचे आवाहन

मुंबई- केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने आज आणि उद्या (२८ व २९ मार्च) देशव्यापी संपाची घोषणा केल्याप्रमाणे आज कामगार संघटनांकडून संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं वीज, बँकिंगसह अनेक कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. याचबरोबर यामध्ये कोळसा पुरवणारे कामगार संपावर असल्यानं राज्यात अनेक ठिकाणी वीज संकट देखील निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संपकरी कामगार संघटनांना एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल आपण पुढे या, असं म्हणत संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं की, वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. २७ हजार मेगावॅटच्या वर वीजेची मागणी गेलेली आहे. दुसरीकडे इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या शेतामधलं उभं पीक आहे आणि त्यांना मदत करावी म्हणून राज्याच्या विधानसभेत आपण त्यांना तीन महिन्यांची सवलत दिल्याचं जाहीर केलं आहे. अशा परिस्थिती महावितरण देखील आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटात असताना देखील आपल्या राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याचा संकल्प आमच्या महावितरणने स्वीकारलेला आहे. अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला वेठीस धरू नये आणि हा संप मागे घ्यावा, अशी विनंती मी केली आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की,  उद्या दुपारी  मुंबई येथील कार्यालायत प्रत्यक्ष बैठक बोलावली आहे. त्यांच्याकडू मला सकारात्मक प्रतिसाद देत सांगण्यात आलं की, आम्ही थोडावेळात सर्व संघटना आपसात चर्चा करून तुम्हाला कळवतो आणि मला संपूर्ण खात्री आहे की सर्व संघटना यावर सकारात्मक विचार करतील. मी देखील राज्याच्या वतीने सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा करणार आहे. खासगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचं होणार नाही, ही खात्री मी त्यांना दिलेली आहे.असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

 

Share