विदर्भात अग्निवर्षाव..! विदर्भात पडले सॅटेलाईटचे तुकडे

चंद्रपूरः विदर्भ आणि मराठवाड्याच्या अवकाशात काल रात्री ७.३० ते ८ च्या दरम्यान अचानक आकाशातून अग्निवर्षा हाेताना दिसली. अनेकांनी ही अवकाशातील घटना पाहिली. काहींच्या मनात कुतूहल तर अनेकांच्या मनात भीती हाेती. हा उल्कावर्षाव हाेता की आणखी काही, ही चर्चा हाेती. भूगर्भ शास्त्रज्ञांनी मात्र हा उल्कावर्षावच असल्याच्या अंदाजाला दुजाेरा दिला. विशेष म्हणजे विदर्भात ठिकठिकाणी आकाशातून हाेणारी ही अग्निवर्षा अनेकांनी पाहिल्याची माहिती आहे. तर या घटनेचा व्हिडिओ काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले होते.

अवकाशातील घडणाऱ्या घडामोडीचे कुतूहल सर्वांनाच आहे. शनिवारी अशाचप्रकारची खगाेलीय घटना नागरिकांना बघायला मिळाली. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा,अमरावती, वाशीम, अकोला, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये हा प्रकाशोत्सव पाहायला मिळाला. आकाशातून आगीचे गाेळे पडताना अनेकांनी पाहिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचे अनेकांना दिसले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायतीच्या मागे रात्री ७.४५ वाजता एका विशेष धातूची तप्त मोठी रिंग कोसळली. त्यापूर्वी अनेकांना ती तप्त लाल रिंग आकाशातून गावाच्या दिशेने येत असल्याचे दिसले आणि क्षणातच ती प्लेट कोसळली. मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. ही धातूची रिंग एवढ्या वेगाने कोसळली की जिथे पडली, तेथील जमीनच त्या रिंगमध्ये आली. घटनेनंतर एकच गर्दी उसळली. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री ८.१५ वाजता घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले आहे. एखादे जुने सॅटेलाइट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळले असावे, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपने यांनी व्यक्त केला आहे.

 

इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे

न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत.

आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

Share