औरंगाबाद : येथील विमानतळाच्या धावपट्टीवर भलामोठा अजगर आढळल्याने खळबळ उडाली होती. चिकलठाणा विमानतळाचे पर्यवेक्षक मंगेश साळवे यांनी प्रसंगावधान राखत सर्पमित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी रात्री पर्यवेक्षक मंगेश साळवे हे पाहणी करत असताना त्यांना धावपट्टीवर अजगर दिसून आला. त्यांनी तत्काळ एटीसी इन्चार्ज मॅनेजर विनायक कटके यांना ही बाब कळविली. सर्पमित्र नीतेश जाधव, पुष्पा शिंदे, शरद दाभाडे यांना बोलावून घेण्यात आले. तब्बल दहा फूट लांबीचा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्रांना तब्बल एक तास लागला. अजगर हा शेड्यूल वन मध्ये गणला जाणारा साप आहे. आधीच त्याच्या प्रजाती कमी होत असताना विनायक कटके यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. अजगराला पकडल्यानंतर डॉ. किशोर पाठक यांच्या निगरानीत त्याला रात्रभर ठेवण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या संमतीने शनिवारी दि.२ रोजी सकाळी अजगराला सारोळा जंगलात सोडण्यात आले.