भाजपचा १०७ वा आमदार कोल्हापूरमधून निवडून येणार -फडणवीस

कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील होत असलेली पोटनिवडणूक जिंकत राज्यातील भाजपचा १०७ वा आमदार निवडून येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला निवडून देतील, असे फडणवीस म्हणाले.

कोल्हापूरमधील जनतेच्या मनात राज्य सरकारच्या विरोधात मोठा आक्रोश आहे. कोल्हापूरकरांसाठी एकही चांगले काम या सरकारने केलेले नाही. महापुरात मागील सरकारने जशी मदत केली, तशी आता पुन्हा केली जावी, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना काहीही मदत केली नाही. याचा परिणाम उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात दिसून येईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचारांचा असून, यंदा भाजपची पॉलिटिकल केमिस्ट्री जमून आली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. इथल्या मतदारांची केमिस्ट्री पूर्णपणे बदलली आहे. मतदारांची केमिस्ट्री ही भगव्याच्या बाजूने आहे हे पाहायला मिळत आहे. पंढरपुरात आम्हाला विठल्लाचा आशीर्वाद मिळाला. आता कोल्हापुरात आई अंबाबाईचा आशीर्वाद मिळणार असल्याचे सांगून, उत्तर कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या जोरावर दहशत पसरवल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. हा महाराष्ट्र आहे की पश्चिम बंगाल, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. शिवसेनेने सर्वच मतदार आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत करतील. नाना कदम भाजपचे १०७ वे आमदार म्हणून निवडून येतील, असे ते म्हणाले.

शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर छद्म धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेली आहे, हे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल करीत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. भाजपची भूमिका ही सुरुवातीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूची राहिली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आडमुठी भूमिका घेत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणं टाळल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असून भाजप या घटनेचा निषेध करतो, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. पवारांच्या घरावर हल्ला करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात होते. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला होणार याची पत्रकारांना माहिती होते. मात्र, पोलिसांना माहिती नाही. पोलिस झोपले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना न विचार करण्याची जुनी सवय आहे. नाना पटोले आमच्याकडे असतानाही तसेच बोलायचे. भगव्याचा त्यांना तिटकारा आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांना भाजपकडून पाच लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Share