मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरवा, अन्यथा हनुमान चालिसा लावणारच! राज ठाकरे यांचा इशारा

ठाणे : भोंगे हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे. मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे ३ मेपर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणारच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तरसभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार, शिवसेना आणि विशेषत: शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. येत्या ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मेपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी सरकारला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी कळकळीची विनंती आहे,  समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा,  असं जाहीर आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केलं. राज ठाकरे यांनी या सभेत सुरुवातीलाच शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पोलीसांचा दुपारी फोन आला होता, माझ्या ताफ्याला कोणीतरी येणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं. मात्र, शरद पवार यांच्या घरी जाणार हे माहीत नव्हतं. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेलचे तारे तोडले, त्यानंतर उत्तर देणं गरजेचं आहे. मात्र, मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायच नव्हतं. कारण काही पत्रकार काही पक्षाला बांधील आहेत; ते पण शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहतो. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तारे तोडले, म्हटलं उत्तर तर दिलं पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या नेत्यांना उत्तर द्यायचं नव्हतं, म्हणून आजच्या सभेचं आयोजन केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

शरद पवार नास्तिक आहेत 
शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय केसरी टूर्स, वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का? महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल होतोय. यांना यांचं जे राजकारण करायचं ते करू द्यात. पण बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की यातून बाहेर या. यातून आपल्या हाताला काहीही लागणार नाहीये. ही सगळी मंडळी फक्त तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले. काय झालं त्याचं? यांंना निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं. त्यातून मतं पदरात पाडून घ्यायची होती.

राज ठाकरे म्हणाले, वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाची मुस्लीम लोकं येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो?

अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या नाही
राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांच्यावर रेड पडते. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर रेड पडते. पण एकाच घरात राहून सुप्रिया सुळे यांच्या घरी रेड पडत नाही. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, १९९९ ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या, असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Share