आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे २१ जूनला होणार प्रस्थान

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदा आळंदी येथून २१ जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, ह.भ.प. नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सहव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते. या बैठकीत आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. यंदा तिथी वृद्धी झाल्याने लोणंद, फलटण येथे दोन दिवस मुक्काम वाढला आहे. दिंडीकऱ्यांच्या मागणीवरून संस्थानच्या सही शिक्क्याने यंदा वाहन पास देण्यात येणार आहे.

 

असा असेल पालखी सोहळा –

  • आळंदी येथून मंगळवार, दि.२१ जून २०२२ रोजी दुपारी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल.
  • बुधवार आणि गुरुवारी (दि.२३ जून) पुणे येथे मुक्काम.
  • शुक्रवार, दि.२५ जून-सासवड येथे आगमन व मुक्काम, शनिवार, दि.२५ जून-पालखीचे पुढे मार्गक्रमण
  • रविवार, दि.२६ जून-जेजुरी
  • सोमवार, दि.२७ जून-वाल्हे
  • मंगळवार, दि.२८ जून व बुधवार, दि.२९ जून-लोणंद
  • गुरुवार, दि.३० जून-तरडगाव
  • शुक्रवार, दि. १ जुलै व शनिवार, दि.२ जुलै-फलटण
  • रविवार, दि.३ जुलै-बरड
  • सोमवार, दि.४ जुलै-नातेपुते
  • मंगळवार, दि.५ जुलै-माळशिरस
  • बुधवार, दि.६ जुलै-वेळापूर
  • गुरुवार, दि.७ जुलै-भंडीशेगाव
  • शुक्रवार, दि.८ जुलै-वाखरी
  • शनिवार, दि.९ जुलै-श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी
  • रविवार, दि.१० जुलै-आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडणार आहे.

येथे होणार उभे रिंगण

  • चांदोबाचा लिंब
  • बाजीराव विहीर
  • इसबावी

येथे होणार अश्वांचे गोल रिंगण

  • पुरंदावडे (सदाशिवनगर, अकलूज)
  • पानीव पाटी
  • ठाकूरबुवा
  • बाजीराव विहीर
Share