औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हळूहळू कामावर रुजू होत आहेत. गेल्या दोन दिवसांत औरंगाबादेत सुमारे १५० कर्मचारी रुजू झाले आहेत.
या कर्मचाऱ्यांकडून ठरावीक नमुन्यात अर्ज, फिटनेस प्रमाणपत्र आगारप्रमुख घेत आहेत. तसेच बडतर्फी, सेवासमाप्तीची कारवाई केलेले कर्मचारीही रुजू होण्यासाठी अर्ज करत आहेत. यापैकी कुणावरही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीही अजून ४० टक्के कर्मचारी संपावरच आहेत. न्यायालयाने दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे २२ एप्रिलपर्यंत सर्वच कर्मचारी रुजू होतील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
औरंगाबाद विभागातील २६४४ कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता. परिवहनमंत्री अनिल परब यांनी वारंवार कामावर परतण्याचे आवाहन केले. त्यानंतर १०५० कर्मचारी रुजू झाले. ७ एप्रिलपर्यंत ५० टक्क्यांच्या जवळपास कर्मचारी रुजू झाले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय देत २२ एप्रिलपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याच्या सूचनाही दिल्या. तेव्हापासून कर्मचारी रुजू होण्याचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत १५४५ कर्मचारी रुजू झाले आहेत.