प्रियांका गांधींकडून २ कोटींचे पेंटिंग विकत घेण्यास भाग पाडले!

नवी दिल्ली : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी प्रियांका गांधी यांच्याकडून एम.एफ. हुसेन यांनी काढलेले राजीव गांधी यांचे पेटिंग विकत घेतले होते. याच पेटिंगच्या खरेदीवरून आता वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी मला जबरदस्तीने प्रियांका गांधी यांच्याकडील पेटिंग विकत घेण्यास भाग पाडले. त्या मोबदल्यात मला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा राणा कपूर यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान केला आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांच्या पुढाकाराने हा व्यवहार झाला होता. राणा कपूर यांनी ‘ईडी’ला यापूर्वीच ही माहिती दिली होती. मात्र, २०२० मध्ये ‘ईडी’कडून नोंदवण्यात आलेल्या त्यांच्या जबाबाचा आणखी काही भाग समोर आला आहे. राणा कपूर यांनी प्रियांका गांधी यांच्याकडून एम.एफ. हुसेन यांनी काढलेले राजीव गांधी यांचे पेटिंग विकत घेतले होते. हे पेटिंग विकत घेतल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी मला फोन केला होता. हे पेटिंग विकत घेतल्याबद्दल पटेल यांनी राणा कपूर यांचे आभार मानले होते. तसेच आगामी काळात देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी तुमचा विचार करू, असेही पटेल यांनी राणा कपूर यांना सांगितले होते. ‘ईडी’ने शनिवारी राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील पीएमएलए न्याायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये राणा कपूर यांच्या या जबाबाचा उल्लेख आहे.

राणा कपूर यांनी या जबाबात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. प्रियांका गांधी यांनी राणा कपूर यांना पेटिंग विकून मिळालेले दोन कोटी रुपये सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारासाठी वापरले. हे पेटिंग तुम्ही विकत घेतले नाहीत तर गांधी परिवारासोबतचे तुमचे संबंध बिघडतील. तसेच तुम्हाला ‘पद्म’ पुरस्कार मिळण्यातही अडचणी होऊ शकतात, अशा धमकीवजा सल्लाही अहमद पटेल यांनी राणा कपूर यांना दिल्याचा उल्लेख जबाबात आहे. राणा कपूर यांनी प्रियांका गांधी यांना पेटिंगचे पैसे धनादेशाद्वारे दिले. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी राणा कपूर यांच्याशी खासगीत बोलताना गांधी परिवार हे पैसे सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे सांगितल्याचा उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात आहे.

Share