शिवसेनेला जळीतळी भाजपशिवाय काहीच दिसत नाही!

मुंबई : शिवसेनेला जळीतळी भाजपशिवाय काहीही दिसत नाही. कारण, भाजपवर टीका केल्याशिवाय आणि भाजपला दुषणं दिल्याशिवाय शिवसेनेला क्षणभर पुढे जाता येत नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

मुंबईत गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना
प्रवीण दरेकर म्हणाले, खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर किरीट सोमय्या तिथे येण्याची गरज काय होती हे विचारणाऱ्या शिवसेनेला मला विचारायचेय की, राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असताना तिथे शेकडोंचा जनसमुदाय जमायची काय गरज होती; परंतु सरकार आमचे आहे, पोलिस आमचे आहेत म्हणून आमच्याविरोधात बोलाल तर आम्ही फोडून काढू, अशी त्यांची दहशतवादी भूमिका दिसते आहे. मला वाटते हे योग्य नाही. किशोरी पेडणेकर म्हणतात त्याप्रमाणे कोणी नख मारून रक्त काढते का? काचा फुटल्याचे दिसतेय तिथे पोलिस आहेत. आमचा तपासावर भरवसा आहे; पण तत्पूर्वीच तुम्ही कलम लावून मोकळे झालात. त्यानुसार स्टेटमेंट द्यायचे, वातावरण तयार करायचे. तरीही सोमय्यांच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस मला या ठिकाणी हतबल झालेले दिसत आहेत. अजूनही किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अतिशय एकतर्फी प्रकारे कारवाई होत आहे.

राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा हा घटनाद्रोह -आ. अतुल भातखळकर


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, राणा दाम्पत्यावर न केलेल्या गोष्टीबद्दल राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे हाच मुळात घटनाद्रोह आहे. हे महाविनाश आघाडीचे सरकार घटनाविरोधी गोष्टी करतेय. आधी ‘ॲक्शन मग सेक्शन’ अशी या सरकारची भूमिका आहे. कोणी जर डोईजड होतेय तर त्यांना पोलिसांमार्फत त्रास द्यायचा. हा जो आणीबाणीतला पॅटर्न होता तो हे सरकार करतेय. राज्यात आणीबाणीपेक्षा भयंकर अवस्था आहे. इथे आणीबाणी घोषित न करता उघड उघड कायदे वाकवले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Share