अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाचा दिलासा; पुण्यातील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुण्यात दाखल एका गुन्ह्यामध्ये सदावर्तेंना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदावर्तेंची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मराठा समाजाबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्याविरोधात १ सप्टेंबर २०२० पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अमर रामचंद्र पवार (रा. कात्रज, पुणे) यांनी फिर्याद दिली होती. सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या या गुन्ह्याप्रकरणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, कोल्हापूर पोलिस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले आहेत.

मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य सदावर्तेंनीच केले होते हे तपासण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाला सांगण्यात आले होते. मात्र, सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतल्याने पुन्हा त्याची गरज काय? असा सवाल न्यायालयाने केला. मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात २०२० मध्ये दाखल एका गुन्ह्यात सदावर्तेंना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ला व हिंसक आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळूनही ते अद्याप जेलमध्येच आहेत. कारण अद्याप त्यांनी जामिनाच्या अटीशर्तींची पूर्तता केलेली नाही.

Share