मानवामध्ये पहिल्यांदा H3N8 बर्ड फ्लूचा (H3N8 Bird Flu) संसर्ग आढळून आला आहे. चीनच्या हेनान प्रांतात एका चार वर्षांच्या मुलाला बर्ड फ्लूच्या या स्ट्रेनची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) याबाबत निवेदन जारी केले असून लोकांमध्ये प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगितले आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चार वर्षांच्या मुलाला तापासह आणखी काही लक्षणं दिसली. त्यानंतर त्याची तपासणी केली असता बर्ड फ्लूचा H3N8 विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली. पण, कोणालाही लागण झालेली नाही. हा मुलगा घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याला तापासह अनेक लक्षणं दिसली.
आतापर्यंत घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये H3N8 स्ट्रेन आढळून आला. पण, या विषाणूचा संसर्ग मानवाला झाला नव्हता. जगात पहिल्यांदाच चीनमध्ये मानवाला या विषाणूची लागण झाली आहे. अद्याप मानवांमध्ये संसर्ग प्रभावी होईल अशी क्षमता या विषाणूमध्ये नव्हती. पण, आता मानवामध्ये देखील संसर्ग आढळून आला आहे. संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असं राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.