ये भोगी!…शिक आमच्या ‘योगीं’कडून;अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुंबई : महाराष्ट्रात भोंग्यामुळे राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. हनुमान चालिसा पठण आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करून टीका केली आहे. ”ये भोगी, काही तरी शिक आमच्या ‘योगीं’कडून !,” असा सल्ला अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन, ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतवरण्याची मुदत राज्य सरकारला दिली आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्याच्या प्रश्नावर एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजपचे नेते गैरहजर राहिले होते.

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1519610840730959872?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519610840730959872%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Famruta-fadnavis-criticize-uddhav-thackeray-for-loudspeaker-politics-glp88

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मागील चार दिवसांत धार्मिक स्थळांवरील ११ हजार भोंगे हटवले आहेत. त्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ट्विटमधून लगावला आहे. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता अमृता फडणवीस यांनीही ”ये भोगी, काही तरी शिक आमच्या ‘योगीं’कडून !,” असे ट्विट करून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे.

Share