जहांगीरपुरी दंगलीतील मुख्य आरोपीला अटक

नवी दिल्ली : राम नवमीनिमित्त दिल्‍लीतील जहांगीरपुरी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर हल्‍ला केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी फरिद याला दिल्‍ली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील तुमलक नावाच्या गावातून दिल्‍ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने फरिदला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिल्‍लीतील जहांगीरपुरी भागात राम नवमीनिमित्त १६ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर प्राणघातक हल्‍ला झाला होता आणि त्यात आठ पोलिस तसेच असंख्य स्थानिक लोक जखमी झाले होते. यावेळी दंगलखोरांनी अनेक गाड्या जाळल्या होत्या. दंगलीतील आरोपींच्या आर्थिक स्त्रोतांची चौकशी व्हावी, यासाठी दिल्‍लीचे पोलिस आयुक्‍त राकेश अस्थाना यांनी काही दिवसांपूर्वी सक्‍तवसुली संचालनालयाला (ईडी) पत्र लिहिले होते. त्यानुसार ईडीने देखील आपला तपास सुरू केलेला आहे.

मिरवणुकीवर हल्‍ला करण्याबरोबरच दंगलीत सहभागी असल्याचा आरोप असलेला फरिद सदर घटनेनंतर फरार झाला होता. दंगलीत सामील असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये दिल्‍ली पोलिसांनी अनेक पथके पाठवली आहेत. मुख्य आरोपी फरिदला अटक करून विमानाने दिल्‍लीला आणण्यात आले. पसार झाल्यानंतर फरिद पश्चिम बंगालमध्ये वारंवार जागा बदलत होता. त्याच्यावर याआधीच पोलिसांत चोरी, स्नॅचिंग, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत असंख्य गुन्हे दाखल आहेत. जहांगीरपुरी भागातला नामचीन गुंड म्हणूनही तो ओळखला जातो.

Share