औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर भीम आर्मी आता चांगलीच आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंनी सभेला पोलिसांना दिलेल्या अटींचं उल्लंघन केलं,तर आम्ही सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने १६ अटी घालून दिलेल्या आहेत. त्याच उल्लंघन राज ठाकरेंकडून सभेत झालं तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही. पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल, त्याच्याविरुद्ध आम्ही आहोत, असं भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदर्दीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील ‘भोंग्याबाबत राजकारण सुरु झालं. ३ मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.