अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. १३ मेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्या वतीने मागील सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. आता पुन्हा एकदा आज न्यायालयाने अनिल देशमुख यांची कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवून १३ मेपर्यंत केली आहे.

ज्या पोलिसांच्या बदल्यांबाबत तपास करायचा आहे त्यांची चौकशी करायची असल्याने देशमुख यांना मध्यंतरी तीन दिवस अधिक कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्यावर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिला आणि देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ मेपर्यंत वाढ केली आहे.

Share