राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात मोरे गैरहजर पक्ष सोडल्याची चर्चा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वी राज ठाकरे पुण्यातील राहात्या घरातून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानी मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र यासर्वांमध्ये पुण्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसत नसल्याचं आढळून आलं आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुण्यात आगमन झालं. यावेळी पुण्यातील सर्व पदाधिकारी राज ठाकरेंच्या स्वागताला हजर होते. मात्र यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे गैरहजर होते. त्यानंतर आज सकाळपासूनच राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी जमले आहेत. मात्र वसंत मोरे गैरहजर आहेत. राज ठाक यांच्या पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावणाऱ्या पुढाकार घेणारे वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

दरम्यान गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अचानक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. त्यावरही वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. तसेच इतर राजकीय पक्षाकडून पक्ष प्रवेशाच्या ऑफर आल्याचं ही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर वसंत मोरे यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

Share