…तरआम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार-अमित ठाकरे

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पुर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील राहात्या घरातून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याआधी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी या सभेआधी मोठं वक्तव्य केलं आहे.

औरंगाबाद पोलीसांनी अनेक अटी शर्तीसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. पोलीसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करून घ्यायला तयार आहोत, असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, तयारी उत्तम झाली असून सर्वांमध्ये सभेची प्रचंड उत्सुकता आहे. उद्याची सभा जोरदार होईल यात शंका नाही, असं देखील अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असल्याने राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलणार हे बघावं लागेल.

औरंगाबादमध्ये होणार ‘राज’गर्जना; सभेसाठी पोलिसांकडून कोणत्या अटी?

राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अनेक अटी घातल्या आहेत.

सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घ्यावी. या वेळेत बदल करू नये.

सभेत आक्षेपाहार्य घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.

शहरात मोटारसायकल, कार रॅली काढू नये.

सभास्थानाच्या आसन व्यवस्थेची कमाल मर्यादा १५ हजार इतकी आहे. १५ हजारपेक्षा अधिक लोकांना आमंत्रित करू नये.

सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म किंवा प्रथा आणि परंपरा यावरून व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होईल, असे चिथावणीखोर भाषण किंवा कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी करू नये.

सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आवाज असावा.

Share