पुणे : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक संबंध आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे
नवाब मलिक यांचा फोटो राज्य सरकारने दिलेल्या जाहिरातीत वापरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिनखात्याचे मंत्री असलेल्या मलिकांचा फोटो शासकीय जाहिरातीत प्रसिद्ध केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
राज्य सरकारने पुण्यातील येरवडा येथे नव्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सोशल मीडियावर या निर्णयाची जोरदार जाहिरातबाजीही सुरू केली आहे. या जाहिरातीत सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येरवडा येथे शासकीय आयटीआय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आयटीआयमध्ये १८ तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी २३ शिक्षक आणि १७ शिक्षकेतर अशा एकूण ४० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
आयटीआयचा कारभार ज्या विभागाच्या अंतर्गत येतो, अशा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांच्यावर ‘ईडी’कडून कारवाई झाली. त्यामुळे मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. नवाब मलिक तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने सातत्याने लावून धरली; परंतु महाविकास आघाडी सरकारने मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पूर्वी मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य शिक्षण व उद्योजकता विभागाचा अतिरिक्त कार्यभार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे, तर अल्पसंख्याक विभागाचा कार्यभार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. बिनखात्याचे मंत्री असलेल्या मलिक यांची येरवडा आयटीआयच्या जाहिरातीमध्ये छबी वापरल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे पुरते हसे झाले आहे. संबंधित जाहिरातीत मलिक यांच्या नावाखाली ‘अल्पसंख्याक मंत्री’ असा उल्लेख आहे हे विशेष.