जळगाव : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले. त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नियतीने आपल्या खांद्यावर टाकली आहे. ती आपण पूर्ण करणार आहोत, असा विश्वास राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते (स्व.) गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्या काळी गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी केले. महाराष्ट्राचे दोनच नाथ ‘एकनाथ-गोपीनाथ’ अशा घोषणा आम्ही त्यावेळी देत होतो. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासात आपण राजकीय कारकीर्द घडविली. त्यांचे कार्य आपण अत्यंत जवळून पाहिले आहे. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. मी मंत्री झाल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हे महामंडळ स्थापन केले. सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती आपण पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज आपण नायक असलो तरी आपल्याला मोठा राजकीय संघर्ष करावा लागला आहे. अगदी आपल्याला दगडही झेलावे लागले आहेत;परंतु नियतीने आज त्याच संघर्षातून आपल्याला नायक बनविले आहे, असेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकीय परिस्थिती वेगळी असती : खडसे
यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, त्या काळी भाजपला बहुजन समाजाचा पक्ष म्हणून ओळख देण्याचे कार्य गोपीनाथ मुंडे यांनी केले, त्यांनी माळी, धनगर, वंजारी समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले. आज जर गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी राहिली असती. मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज धनंजय मुंडे यांच्यावर असून, त्यांनी ती पूर्ण करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.