शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

अहमदनगर : शेततळ्यात पाय घसरून पडलेल्या भावाला वाचवण्यासाठी बहिणीने शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (८ मे) सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोधळवाडीनजीक घाणे वस्ती येथे घडली.

जयश्री बबन शिंदे वय (वय २१ वर्षे) व आयुष बबन शिंदे (वय ७ वर्षे) असे शेततळ्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेव स्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी (८ मे) सकाळी त्यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला.

बहीण-भाऊ शेततळ्यामध्ये बुडाल्याची माहिती समजताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वीच दाेघांचा मृत्यू झाला होता.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव येथील दोघा सख्‍ख्‍या बहिण-भावाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य पाहताच गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. बहीण- भावाच्या मृत्यूने गावकरी हळहळले. या दुर्घटनेमुळे पिंपळगाव देपा गावासह पठार भागावर शोककळा पसरली आहे.

Share