भगतसिंग कोश्यारी आहेत तोवर काकडेंना ‘एमएलसी’ देऊ नका : गिरीश बापट यांचा शरद पवारांना सल्ला

पुणे : आजकाल राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राज्यातील सध्याची राजकारणाची स्थिती बिकट आहे. मी बापट असलो तरी राष्ट्रवादीचे अंकुश काकडे पोपट आहेत. अंकुश काकडे यांना काहीही द्या, फक्त भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असेपर्यंत काकडे यांना विधान परिषद देऊ नका, असा विनंतीवजा सल्ला पुण्याचे खासदार, भाजप नेते गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश आण्णा काकडे यांनी लिहिलेल्या ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. याप्रसंगी बोलताना खासदार गिरीश बापट यांनी जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि भाजप नेते खासदार गिरीश बापट यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांनी काकडेंना काहीही द्या, फक्त कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका, अशी विनंती शरद पवारांकडे केली. बापटांना मित्राची असलेली काळजी आणि त्यांच्या गुगलीने अख्खे बालगंधर्व रंगमंदिर हास्यकल्लोळात बुडाले.

या कार्यक्रमास खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास दादा पवार, प्रा.मिलिंद जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात शरद पवार यांनी जुन्या आठवणी जागवल्या. गिरीश बापट यांनी अंकुश अण्णांबरोबच्या जुन्या मैत्रीला नव्याने उजाळा दिला, तर उल्हास पवारांनी अंकुश काकडे यांचा स्वभाव आणि गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली.

शरद पवार म्हणाले, ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसूत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्यपासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उरूस या सगळ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगीण दस्तावेजीकरण आहे. पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगिकीकरण, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनत असून, शैक्षणिक संस्थांद्वारे शिक्षणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे आचार-विचार आणि संस्कृतीही पुण्यात येत आहे. पूर्वी पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जाणारे पुणे आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे हब झालेले आहे. पुण्याने देशाला कायमच विचार देण्याचे काम केले आहे; परंतु अलिकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि कमी होत चाललेला साहित्य व्यवहार ही धोक्याची घंटा आहे. भौतिकदृष्ट्या समाज किती विकसित आहे, यापेक्षा वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या समाज किती प्रगत आहे, यावर तो समाज किती पुढे जाईल हे ठरत असते. वाचन संस्कृतीची पाळेमुळे रुजलेल्या पुण्यात ललित साहित्याची उलाढाल प्रचंड मंदावलेली आहे.

खा.गिरीश बापट म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव पुलाला दिले; पण ही संकल्पना दुसऱ्याच्या नावे आहे. संकल्पना म्हणजे काय हे मला समजतच नाही. आजकाल सुशिक्षित लोकं मतदान करत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुण्यात अनेक प्रश्न गंभीर आहेत. पुण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे; परंतु याची चर्चा सभागृहात होत नाही. आंदोलने फक्त प्रसिद्धीसाठी न होता संबंधित आंदोलनातून लोकांचा फायदा होईल याचा विचार झाला पाहिजे.

Share