चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेची ६७ कोटींची मालमत्ता जप्त

कानपूर : बहुचर्चित बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कानपूरच्या जिल्हा न्यायालयाने विकास दुबे आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. विकास दुबे आणि त्यांच्या काही नातेवाईकांच्या मालमत्तेबाबत कानपूरच्या पोलिस अधीक्षकांनी कानपूर कोर्टात अहवाल सादर केल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला.

न्यायालयाने बिकरू, चौबेपूर, कानपूर देहात, लखनौ येथील विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांच्या १३ स्थावर आणि १० जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्याची मालमत्तांवर रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली जाईल आणि त्यांची स्वाक्षरी असेल. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विकास दुबे यांच्या पत्नी, आई आणि दोन्ही मुलांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

यासोबतच विकास दुबे यांचे रोखपाल जय वाजपेयी यांच्याविरोधातही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जय वाजपेयी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) चौकशी करणार आहे. अधिवक्ता सौरभ भदौरिया यांनी जय वाजपेयींसह ५३ जणांविरुद्ध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता जय वाजपेयींसह ५३ जणांची चौकशी केली जाणार आहे.

२ जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील बिकरू येथे घडलेल्या घटनेने सबंध देश हादरला होता. या प्रकरणात कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या बिकरू गावात पोलिसांवर गोळीबार केला होता. यात ८ पोलिस शहीद झाले होते. या घटनेनंतर विकास दुबे फरार झाला होता. पोलिसांनी विकासच्या अनेक साथीदारांवर कारवाई केली. विकास दुबेला १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पकडण्यात आले. विकास दुबेला अटक केल्यानंतर यूपी पोलिस आणि एसटीएफ विकासला कानपूरला आणत होते. कानपूरला पोहोचण्यापूर्वीच यूपी पोलिसांची त्याच्याशी चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने वाटेत पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत चकमकीत ठार केले.

Share