मुंबईत दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर ‘एनआयए’ची कारवाई

मुंबई : कुख्यात दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. ‘एनआयए’ने सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली. भेंडीबाजार, नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रूझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईतून आता ‘एनआयए’च्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फेब्रुवारी महिन्यात कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ‘एनआयए’ सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच माहितीच्याआधारे ‘एनआयए’ने आजची कारवाई केल्याचे सांगितले जाते.

https://twitter.com/ANI/status/1523496089152004096?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1523496089152004096%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fnia-raids-begin-at-several-locations-in-mumbai-in-connection-with-gangster-dawood-ibrahim%2Farticleshow%2F91429091.cms

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला २००३ मध्ये ‘यूएन’ने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील कराची येथून अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद इब्राहिमवर ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्यापासून दाऊदशी संबंध असलेल्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. दाऊदच्या टोळीतील सदस्यांच्या गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांच्या संपूर्ण प्रकरणावर ‘एनआयए’ची करडी नजर आहे.

https://twitter.com/ANI/status/1523496087159713792?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1523496087159713792%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fnia-raids-begin-at-several-locations-in-mumbai-in-connection-with-gangster-dawood-ibrahim%2Farticleshow%2F91429091.cms

दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘एनआयए’कडे सोपवला होता. ‘एनआयए’ ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि ‘एनआयए’ ने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. दाऊदच्या टोळीकडून चालवण्यात येणाऱ्या गुन्हेगारी आणि दहशतवादी जाळ्याची पाळेमुळे खणण्याचे काम ‘एनआयए’कडून सुरू आहे. आतादेखील ‘एनआयए’ने मुंबईतील दाऊदशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घरांवर आणि मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

Share