मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दौऱ्याचं नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईसह ठाण्यातील सर्व विभाग अध्यक्षांची एक बैठक मुंबईत पार पडली. यानंतर नेते मंडळींचे एक शिष्टमंडळ लवकरच तयारीसाठी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, या सर्व बाबींसह भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ येथे बैठक बोलाविली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून वादविवादांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. सिंह यांच्या मागणीला मनसेच्या नेत्यांकडूनही प्रतिआव्हान देण्यात आलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.