सातारा : कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेतल्या काही ओळींचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या आणि साल्यांनो आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत.” असे विधान शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी (दि. ९ मे) सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आयोजित ‘पुरस्कार वितरण सोहळा व भव्य महिला मेळावा’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “मी पूर्वी जेव्हा औरंगाबादला जायचो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये उपेक्षित समजातली काही मुलं तिथे शिकायची. शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही ही मुलं उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड नावाचा एक कवी त्याकाळी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये शिकवायचा. त्याने त्याच्या कवितेत असं म्हटलंय की, ‘आम्ही आमच्या चीनी हाथोड्यापासून बनवलेल्या जात्यामुळे आज अनेकांचं पोट भरत आहे. या सोबतच आम्ही अनेक गोष्टी बनवल्या. तुम्ही ज्यांची पूजा करता ते ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही आमच्या चीनी हातोड्यापासून घडवल्या. त्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि आता आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही.'”. पवारांच्या या उदाहरणावरून त्यांनी पुन्हा एकदा जातीवादी मुद्द्यात हात घातल्याचे स्पष्ट होत आहे.