उद्धव ठाकरेंच्या सभेदिवशी १४ तारखेला राजधानीत ‘महाआरती’ : राणा दाम्पत्याची घोषणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट केलेल्या आणि पुढे त्यावरूनच तुरुंगात गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज (बुधवार) राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुनश्च टीका केली. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी म्हणजे १४ मे रोजी राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणा यावेळी राणा दाम्पत्याने केली.

उद्धव ठाकरे जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. केवळ मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचे सांगून आ. रवी राणा म्हणाले, इंग्रजांच्या काळात अनेक महापुरुषांवर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले होते. राज्यात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आज राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती दिली आहे. इंग्रजांच्या काळातील कायदा मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करीत आहे; पण ठाकरे सरकार अद्यापही इंग्रजांचे कायदे पाळत आहे, हे राज्याचे दुर्दैव आहे. ठाकरे सरकारने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप आ. राणा यांनी केला.

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महाआघाडी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्सदविवेक बुद्धी द्यावी, असे साकडे घालत १४ मे रोजी दिल्लीतील हनुमान मंदिरात ‘महाआरती’ करणार असल्याचे जाहीर केले. नवनीत राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरून निवडणूक लढतील काय? हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढणार, हेही त्यांनी जाहीर करावे. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील संकटमोचन हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेले आहे, ते दूर झाले पाहिजे, अशी मागणी आम्ही हनुमानचरणी करणार आहोत.

बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढा. हे मात्र नक्की की, मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार, फक्त १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा, असे आव्हानच नवनीत राणा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

 

 

 

Share