जळगाव : बंद पडलेल्या टॅंकरमधून दुसऱ्या टॅंकरमध्ये दूध टाकत असताना भरधाव आलेल्या ट्रकने टॅंकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी चार जण धुळे जिल्ह्यातील तर एक जण जळगाव येथील आहे.
पवन सुदाम चौधरी (वय २५), धनराज बन्सीलाल पाटील (वय ४८), धनराज सुरेश सोनार (वय ३७), उमेश राजेंद्र सोळंके (वय ३५) आणि भालचंद्र गुलाब पाटील (वय ३१) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर काल गुरुवारी रात्री धुळे येथून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. यासाठी एक क्रेनदेखील मागवण्यात आला होता. बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध टाकण्याचे काम सुरू असताना अंधारात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हा टँकर दिसला नाही. त्यात समोरून भरधाव आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने उभ्या दुधाच्या टँकर्सला आणि क्रेनला धडक दिली. पाठोपाठ दोन कारही या ट्रकवर आदळल्या. त्यात बंद पडलेल्या दुधाच्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मयतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
या अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. घोडसगाव येथील पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.