मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी तुरुंगात असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.
मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. उपचांरासह पोलिस बंदोबस्ताचा खर्चदेखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सुरुवातीला ते पोलिस कोठडीत होते. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तेव्हापासून नवाब मलिक यांचा आजार उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना स्ट्रेचरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
Special PMLA court allows Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital.
Malik's lawyer requested a private hospital medical treatment, to which ED didn't object, keeping some conditions. pic.twitter.com/AcZLfw6rts
— ANI (@ANI) May 13, 2022
नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचे जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी जामिनाची मागणी केली होती. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी उपचार करण्याची इच्छा असल्याने सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.