महागाईने गाठला आठ वर्षांतील उच्चांक; नागरिकांच्या खिशाला कात्री!

नवी दिल्ली : देशात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. महागाईत सतत वाढ होत चालल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिलमधील किरकोळ महागाईचा तपशील गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार एप्रिलमध्ये महागाई ७.७९ टक्के अशा उच्चांकी स्तरावर पोहोचल्याचे दिसून आले. किरकोळ महागाईचा हा गेल्या आठ वर्षांतील उच्चांक आहे. यापूर्वी मे २०१४ मध्ये किरकोळ महागाईने ८.३३ टक्क्यांचा स्तर गाठला होता. आता महागाई दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून आगामी पतधोरणात व्याजदरात वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

महागाईचा फटका बचतीस बसत असल्याने भरघोस परतावा देणारा पर्याय म्हणून शेअर बाजाराकडे वळलेल्या गुंतवणूकदारांनादेखील गुरुवारी मोठा झटका बसला. गुरुवारी एकाच सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ११५८ अंकांनी कोसळला. चालू आठवड्यात सेन्सेक्समध्ये एकूण १९०५ अंकांची घसरण झाली आहे. गुरुवारी एकाच दिवसात समभागधारकांचे सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

शहरांपेक्षा खेड्यांमध्ये महागाईचा दर जास्त

कच्चे तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाईचा दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे २९९ वस्तूंच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो. एप्रिलमध्ये महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना झटका बसला आहे. खाद्यपदार्थांपासून तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने आठ वर्षातील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये ७.७९ टक्के वाढली आहे. मे २०१४ मध्ये किरकोळ महागाई दर ८.३२ टक्के होता. शहरांपेक्षा खेड्यांमध्ये महागाईचा दर जास्त आहे. आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ग्रामीण भागातील महागाई ७.६६ टक्के होती. एप्रिल २०२१ मधील ३.७५ टक्क्यांच्याच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये खेड्यांमध्ये महागाई ८.३८ टक्क्यांपर्यत वाढली. तर मार्चमध्ये शहरांमधील महागाईचा दर ६.१२ टक्के होता. एप्रिल २०२१ मधील ४.७१ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये ७.०९ टक्के महागाई वाढली आहे.

किरकोळ महागाईचा हा आकडा सलग चौथ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. जानेवारी २०२२ पासून किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थातील महागाई दर ८.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर मागील महिन्यात ७.६८ टक्के होता आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात १.९६ टक्के होता. यंदा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ६.९५ टक्के होता. खाद्यान्न व इंधनदरात वाढ होत असल्याने एप्रिलमध्येही हा दर चढा राहील, अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यानुसार या दराने एप्रिलमध्ये ७.७९ टक्क्यांचा चिंताजनक स्तर गाठला.

एप्रिलमध्ये सर्वाधिक दरवाढ ही खाद्यान्नाच्या श्रेणीतच झाली आहे. ही दरवाढ ८.३८ टक्के असून, मार्चमध्ये हा दर ७.६८ टक्के होता. एप्रिलमध्ये फळभाज्या व खाद्यतेलाच्या दरात भरमसाट वाढ झाल्याचे दिसून आले. ‘ग्राहक किंमत निर्देशांक’ निश्चित करण्यात खाद्यान्न श्रेणीचा अर्धाअधिक वाटा असल्याने ही दरवाढ निर्णायक ठरली. एप्रिलमध्ये फळभाज्यांच्या श्रेणीत १५.४१ तर, इंधनदराच्या श्रेणीमध्ये १०.८ टक्के अशी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. देशांतर्गत किरकोळ महागाई सहा टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवावी, असे निर्देश केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत; परंतु गेल्या चार महिन्यांत हा दर सहा टक्क्यांहून कमी राखण्यात रिझर्व्ह बँकेला अपयश आले आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ
रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर पहिल्या तिमाहीत ६.३ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५ टक्के, तिसर्‍यामध्ये ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के महागाई राहण्याचा अंदाज वर्तवला होता. महागाईच्या चिंतेमुळे आरबीआयने व्याजदरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेतला. बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आगामी काळातही महागाई कायम राहण्याची शक्यता आहे.

Share