पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज ठाकरे यांची २१ मे रोजीची जाहीर सभा आता २२ मे (रविवार) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली.
राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या दौऱ्याआधी ते पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. याआधी २१ मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे डेक्कन येथील नदीपात्रात आयोजन करण्यात आले होते; पण पावसाची शक्यता लक्षात घेता आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.
अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि सभेसंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले होते. मंगळवारी रात्री अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली होती. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी अचानक पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून ते मुंबईला परतले होते. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आता ही सभा रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आज गुरुवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची पुण्याच्या जाहीर सभेबाबत चर्चा झाली. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याआधी खूप विषयांवर बोलायचे आहे. म्हणूनच पुण्यातील या सभेचे आयोजन केलेले आहे. २१ तारखेची नदीपात्रातील सभा पावसाचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नदीपात्रात मेट्रोचे कामदेखील सुरू आहे. जर तिथेच सभा घेतली असती आणि जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्या नागरिकांना मोठा त्रास झाला असता व त्यांचा हिरमूड झाला असता. त्यापेक्षा राज ठाकरे यांची परवानगी घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेची तारीख आणि ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे नांदगावकर म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यासह अयोध्येतील काही साधू, संतांनी विरोध केला आहे. बृजभूषण सिंह तर विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र करत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यातील सभेत रोखठोकपणे भाष्य करण्याची शक्यता आहे.